आपने मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून भाजपला डिवचले
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. आता भाजपने सुध्दा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव दिल्लीच्या जनतेला सांगावे, असे थेट आव्हान आपने दिले आहे. आप नेते गोपाल राय म्हणाले की, आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत आहे. केजरीवाल यांच्या विरोधात भाजपचा चेहरा कोण आहे? हे भाजपने आता स्पष्ट करावे. आप, भाजप आणि कॉंग्रेसने 70 विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अशात, भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, असे राय म्हणाले.
दिल्ली विधानसभेची निवडणूक आता रंगात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. अशात, आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाच्या चेहयाचा विषय काढून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीत भाजपची अवस्था वाईट आहे. एनआरसी कायद्याला विरोध दर्शवित अकाली दलासारख्या पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. आता जेडीयू एकमेव सहकारी उरला आहे. ज्यांचा दिल्लीत काहीही अस्तित्व नाही. कॉग्रेस फक्त आपली उपस्थित दर्शविण्यासाठी रिंगणात आहे.
भाजप सरकार बनविण्याचा तथाकथित दावा करीत आहे. अशात, खरंच सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? हे भाजपने लोकांना सांगावे, असे आव्हान राय यांनी दिले.