मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या डिआयजी निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी आज पूर्ण झाली. न्या. प्रकाश नाईक यांनी निर्णय उद्या दिला जाईल असे स्पष्ट केले. गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असलेल्या डीआयजी मोरे यांना सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही, त्यामुळे हायकोर्टानेही तूर्तास मोरेंना अटकेपासून कोणताही दिलासा दिलेला नाही.
सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर डिआयजी निशिकांत मोरे यांच्यावतीने उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्या अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आलेल्या संबंधित मोबाईल क्लीप्सचा सविस्तर पंचनामा राज्य सरकारने आज सादर केला.
तर मोरे यांच्यावतीने त्यांच्याकडील मोबाईल क्लीपमध्ये पीडित मुलीचा कोणत्याही प्रकारे विनयभंग झाल्याचे स्पष्ट होत नाही, असे स्पष्ट केले. केवळ केवळ दोन कुटूंबियांमध्ये आर्थिक व्यवहारावरून निर्माण झालेल्या वादावरून हे आरोप करण्यात आल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले. तर तक्रारदारांने तक्रार उशीरा केल्याच्या आरोपाचे खंडन केले. उभय पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय उद्या बुधवारी देण्याची शक्यता आहे.