चंदीगढ – पंजाबमधील राज्यसभेच्या पाच जागांवर निवडणूक होणार असून पंजाब विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने आलेल्या आम आदमी पक्षाचा पाचही जागांवर विजय निश्चित मानला जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे. पंजाब आपचे प्रभारी राघव चढ्ढा, क्रिकेटपटू हरभजन सिंग, रणनीतीकार संदीप पाठक, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) चे संस्थापक अशोक मित्तल आणि उद्योगपती संजीव अरोरा यांना आम आदमी पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.
कोण आहे संदीप पाठक?-
संदीप पाठकला त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. पाठक हे अरविंद केजरीवाल यांच्या कोअर टीमचे प्रमुख सदस्य आहेत आणि आयआयटी दिल्लीमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयात पडद्यामागे संदीप पाठक यांची फार महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते. पाठक अनेक वर्षांपासून ‘आप’साठी रणनीतीचे काम करत आहेत आणि पंजाबमध्येही त्यांनी ‘आप’साठी एक अनोखी रणनीती बनवली होती. उमेदवार निवडीपासून ते जाहीरनामा तयार करण्यापर्यंत संदीप पाठक यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे बोलले जाते. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या मोठ्या विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी संदीप पाठक यांचे कौतुक केले होते.
प्रशांत किशोर यांच्यासोबत केले आहे काम –
पाठक यांनी आयआयटी दिल्लीतून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे परदेशात काम केले. परदेशातून परतल्यानंतर संदीप पाठक आम आदमी पार्टीमध्ये रणनीतीकार म्हणून सामील झाले आणि पंजाबमध्ये ‘आप’साठी काम करू लागले. संदीपने यापूर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत काही काळ काम केले होते.
संदीप पाठक व्यतिरिक्त, आम आदमी पार्टीने राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा, क्रिकेटर हरभजन सिंग, एलपीयूचे संस्थापक अशोक मित्तल आणि उद्योगपती संजीव अरोरा यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मान सरकार हरभजन सिंगला खेळाशी संबंधित काही मोठी जबाबदारी देऊ शकते, असे बोलले जात आहे. 31 मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. पंजाबमध्ये आपचे 92 आमदार असून पाचही जागांवर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.