नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi) यांच्यासह १४ जणांनी गुरूवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे २५ वर्षे लोकसभेच्या खासदार असणाऱ्या सोनियांची आता राज्यसभेतील इनिंग सुरू झाली आहे.
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी नवीन संसद भवनात नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. प्रथमच राज्यसभेच्या सदस्या बनलेल्या सोनियांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि कन्या प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. सोनिया सर्वप्रथम १९९९ मध्ये उत्तरप्रदेशच्या अमेठीतून लोकसभेवर निवडून गेल्या.
त्यानंतर २००४ यावर्षी उत्तरप्रदेशच्या रायबरेलीमधून त्या लोकसभेत पोहचल्या. सलग ५ वेळा त्या लोकसभेवर निवडून गेल्या. यावेळी वाढते वय आणि प्रकृतीचे कारण देऊन त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तसे असले तरी राजस्थानातून राज्यसभेवर निवड झाल्याने त्यांचा संसदेतील वावर कायम राहणार आहे.
आता सोनियांच्या जागी रायबरेलीत कॉंग्रेसचा उमेदवार कोण असणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्या प्रमुख नावांमध्ये रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव (भाजप) आणि अजय माकन (कॉंग्रेस) यांचा समावेश आहे.