चंडिगढ – पंजाबमधील सत्तारूढ आपने बुधवारी त्या राज्याच्या पोलीस प्रमुखांकडे भाजपविरोधात तक्रार दिली. पंजाब सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपने केली आहे.
पंजाबचे अर्थमंत्री आणि आपचे नेते हरपालसिंग चिमा यांनी मंगळवारी सनसनाटी आरोप केला. आता पंजाब सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून आपच्या 10 आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
त्यानंतर आपने आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारत थेट पोलीस प्रमुख गौरव यादव यांच्याकडे धाव घेतली. त्यांची भेट घेऊन आप आमदारांच्या शिष्टमंडळाने औपचारिक तक्रार दिली. पोलीस प्रमुखांकडे सर्व पुरावे सादर केले असल्याचे आपने म्हटले आहे.
आपने उचललेल्या पावलांनंतर पंजाबमधील राजकारण आणखीच तापण्याची चिन्हे आहेत. भाजपने याआधीच आपचे आरोप खोटे आणि निराधार असल्याची प्रतिक्रिया दिली. एवढेच नव्हे तर, आपला माहिती उघड करण्याचे आव्हानही दिले.