नवी दिल्ली – पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठे बहुमत मिळणार असल्याचा एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे. त्याचे स्वागत करताना आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे की आमच्या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार असून आम्ही देश पातळीवर आता कॉंग्रेसची जागा घेऊ.
ते म्हणाले की, लोकांनी पारंपारिक राजकीय पक्षांना नाकारले आहे. त्यांना आमच्या पक्षाचा पर्याय पसंत पडू लागला असून आम्ही आता सर्वात वेगाने विकसित होणारा राजकीय पक्ष ठरत आहोत. आमचा पक्ष नैसर्गिकरित्या कॉंग्रेसची जागा घेणार आहे,असा दावाही त्यांनी केला आहे.
काल बहुतेक सर्वच संस्थांनी पंजाबात आम आदमी पक्ष स्पष्ट बहुमताने सत्तेवर येईल असे भाकित वर्तवले आहे. या पक्षाने भगवंत मान यांना या आधीच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले आहे. त्यामुळे मान यांच्या भोवती तेथे सध्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा सातत्याने गराडा पडत आहे. आम आदमी पक्षाची स्थापना सन 2012 साली झाली आहे.
स्थापनेनंतरच्या दहा वर्षातच या पक्षाला दोन राज्यांत सत्ता आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. चाणक्य संस्थेने पंजाबात आम आदमी पक्षाला 117 पैकी तब्बल 100 जागा मिळतील असे भाकित वर्तवले आहे, तर इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आपला पंजाबात 76 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज आहे.