Aam Aadmi Party MP Sanjay Singh arrested – दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांची 10 तास चौकशी केली होती. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत त्यानंतर आता संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे.
मद्य घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगचा तपास ईडी करत आहे. नुकतेच या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये संजय सिंह यांचेही नाव आहे. या घोटाळ्यात संजय सिंह यांचे नाव समोर येण्यामध्ये दिनेश अरोरा हा व्यक्ती महत्त्वाचा दुवा मानला जात आहे.
दिनेश अरोरा हा व्यक्ती दारू घोटाळ्यात आरोपी होता, पण नंतर तो सरकारी साक्षीदार झाला. दिनेश अरोरा यांच्या साक्षीच्या आधारे आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव आले आले.
दिनेश अरोरा यांनी काय-काय आरोप केले? –
संजय सिंह यांच्या अटकेमागे दिनेश अरोरा यांची साक्ष आहे. दिनेश अरोरा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे. या बैठकीला संजय सिंह देखील उपस्थित होते.
ईडीला दिलेल्या जबाबात दिनेश अरोरा यांनी सांगितले की, ते एका कार्यक्रमात संजय सिंह यांना भेटले होते, त्यानंतर त्यांनी मनीष सिसोदिया यांची भेट घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली निवडणुकीपूर्वी निधी गोळा करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला होता.
आरोपपत्रानुसार, ‘दिनेश अरोरा पहिल्यांदा संजय सिंह यांना भेटला होता. त्यांची भेट मनीष सिसोदिया यांच्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या पार्टीत झाली. संजय सिंह यांच्या सांगण्यावरून अरोरा यांनी अनेक रेस्टॉरंट मालकांशी चर्चा केली. अरोरा यांनी दिल्ली निवडणुकीसाठी पक्ष निधी गोळा केला आणि सिसोदिया यांना 32 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या बदल्यात संजय सिंह यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे प्रलंबित असलेले दिनेश अरोरा यांचे एक प्रकरण निकाली काढल्याचा आरोप ईडीने केला आहे.
दिनेश अरोरा कोण आहे?
दिनेश अरोरा हे दिल्लीचे एक मोठे उद्योगपती आणि रेस्टॉरंट उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे. अरोरा 2009 पासून या उद्योगाशी संबंधित आहेत. रिपोर्टनुसार, 2009 मध्ये त्यांनी दिल्लीच्या हौज खास भागात आपला पहिला कॅफे उघडला.
त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर उपलब्ध माहितीनुसार, तो चिका दिल्ली, अनप्लग्ड कोर्टयार्ड आणि ला रोका एरोसिटीचा व्यवस्थापकीय संचालक देखील आहे.
सीबीआयनुसार, दिनेश अरोरा हे राधा इंडस्ट्रीजचे संचालक आहेत. याशिवाय अरोरा नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) चे समिती सदस्य देखील आहेत. एवढेच नाही तर जुलै 2028 मध्ये अरोरा यांनी ईस्टमन कलर रेस्टॉरंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. NRAI वेबसाइटनुसार, आज दिनेश अरोरा यांची दिल्लीच्या सर्व मोठ्या बाजारपेठांमध्ये रेस्टॉरंट्स आहेत. अरोरा हे खाण्यापिण्याचे शौकीन आहेत.
कोविड लॉकडाऊन दरम्यान जेव्हा त्यांनी गरजूंना रेशनचे वाटप केले तेव्हा अरोरा देखील चर्चेत आले. त्यांनी आपल्या घराचे पॅकेजिंग युनिटमध्ये रूपांतर केले होते आणि येथून ते अन्न पॅक करून गरीब आणि गरजूंपर्यंत पोहोचवले जात होते.
दिनेश अरोरा यांची प्रेमकथा –
दिनेश अरोरा यांनी काही वर्षांपूर्वी पूजा नावाच्या मुलीशी लग्न केले. दोघांची प्रेमकहाणी फिल्मी कथेसारखीच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे पहिल्या नजरेतील प्रेमाचे प्रकरण होते आणि पूजानेच दिनेशला प्रपोज केले होते.
2016 मध्ये पूजा दिनेशच्या व्यवसायाशी जोडली गेली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. पूजाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला आणि दिनेशला एकाच प्रकारचे जेवण खायला आवडते, एकाच प्रकारचे संगीत ऐकायला आणि एकत्र प्रवास करायला आवडते. पूजाच्या म्हणण्यानुसार, दिनेश रेस्टॉरंटचे डिझाईन, ऑपरेशन, फायनान्स आणि टीम बिल्डिंग हाताळतो, तर ती मार्केटिंग पाहते.
काय आहे दिल्ली दारू घोटाळा?
दिल्ली सरकारच्या २०२१-२२ च्या नवीन मद्य धोरण प्रकरणी हा घोटाळा जोडला गेला आहे. केजरीवाल सरकारने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्लीत नवीन दारू धोरण लागू केले होते. या धोरणांतर्गत दारु व्यवसाय हा पूर्णपणे खाजगी व्यक्तींकडे गेल्याचा आरोप करण्यात आला. सरकारने नवीन धोरण आणण्यासाठी माफिया राजवट संपवण्याचा युक्तिवाद केला होता. त्यामुळे महसुलात वाढ होईल, असा दावाही करण्यात आला होता. मात्र, हे धोरण लागू झाल्यानंतर त्याचे परिणाम सरकारच्या दाव्याच्या उलट आहेत. महसूल बुडाल्याने दिल्ली सरकार चौकशीच्या फेऱ्यात आले. यानंतर केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी यात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांना या बाबत कळवले. अहवालाच्या आधारे, एलजीने २२ जुलै २०२२ रोजी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.