मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 97 वी जयंती असून या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून जोरदार कार्यक्रमांचे आजयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्गातील एका तरुणाने बाळासाहेबांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. वेंगुर्ल्यातील निवती समुद्रकिनारी बाळासाहेबांचं 20 फूट आकाराचे शिल्प या तरुणाने साकारलं आहे. सध्या सगळीकडे या शिल्पाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.
रविराज चिपकर असं कलाकाराचं नाव असून, दोन तासात याने हे 20 फूट आकाराचे शिल्प साकारलं आहे. आज बाळासाहेबांना राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून अभिवादन केलं जात आहे. अश्यातच या तरुणाने आपल्या कलेच्या माध्यमातून हे अनोखं शिल्प साकारत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली आहे.
दरम्यान, आज दादर येथील शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने येणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी दोन्ही पक्षातील प्रतिनिधी तसेच शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतील.