नवी दिल्ली : आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात वेळोवेळी नवनवीन प्रयोग करण्यावर लोकांचा भर असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक यशस्वी प्रयोग आयआयटी क्षेत्रातील दोन तरुण मुलींनी करून दाखवला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याचे दिसून येत आहे. स्टार्टअप पीडियाने या प्रेरणादायी मुलींच्या प्रवासाविषयी माहिती दिली आहे.
आयआयटी दिल्लीच्या दोन मुलींनी जनावरे खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म, ‘अॅनिमॉल’ अॅप सुरू केले आहे. त्यातून त्यांनी शेतकऱ्यांची मदत तर केलीच सोबत सध्या त्या कोट्यावधींची कमाई करत आहेत. आर्थिक वर्ष २०२२ साठी या प्लॅटफॉर्मची कमाई ७.४ कोटी होती तर आता घडली कंपनीची कमाई ५६५ कोटी इतकी वाढली आहे,
आयआयटी-दिल्लीमधून पदवी घेत असताना नीतू यादव आणि कीर्ती जांगरा यांना काहीतरी वेगळे करायचे होते. संपूर्ण भारतातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म, Animall हा प्रकल्प म्हणून ऑगस्ट २०१९ गुरुग्राममध्ये हा उद्योग सुरू झाला. नीतू आणि कीर्ती यांनी हजारो शेतकऱ्यांशी बोलून आणि भारतातील गुरांचा बाजार अत्यंत असंघटीत आहे हे जाणून घेतल्यानंतर त्यांनी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
“ग्रामीण भारतासाठी दुग्ध-व्यवसाय हा सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा आहे आणि आम्हाला तो आणखी मोठा करायचा आहे,” असे नीतू यादव यांनी म्हटले आहे. लिंक्डइन पोस्टनुसार, बेंगळुरू-आधारित स्टार्टअपची स्थापना 2019 मध्ये झाली आहे. Animall चे संस्थापक अनुराग बिसोय, कीर्ती जांगरा, लिबिन व्ही बाबू आणि नीतू यादव यांनी मिळून हा व्यवसाय सुरु केला.
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जनवरांची खरेदी विक्रीचा व्यापार आणि दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्याच्या उद्देशाने हे व्यासपीठ तयार केले आहे. हे डिजिटल प्लॅटफॉर्म जनावरांना आरोग्य सेवा देखील पुरवते. कंपनीने २०२२ मध्ये गुरांच्या व्यापारातून ९०% कमाई केली. उर्वरित १०% आरोग्यसेवा, कृत्रिम गर्भाधान आणि मार्केटप्लेस कमिशनमधून कमाई केली आहे.
कंपनीने २०२२ मध्ये ३.९४ कोटीचे उत्पन्न देखील मिळवले, ज्यामुळे त्यांचे एकूण उत्पन्न ११.३४ कोटी झाले. स्टार्टअपला विक्री आणि वितरणासाठी १८.०४ कोटी खर्च आला, जो २०२२ मध्ये त्याच्या एकूण खर्चाच्या ३२.५% इतका होता. Beenext, Sequoia, Nexus Ventures सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांकडून सुमारे १७० कोटी निधी उभारण्यात Animall यशस्वी झाले आहे. त्यामुळे या दोन मुलींच्या यशस्वी प्रयोगाचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.