मंचर -आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील अत्यवस्थ रुग्णांच्या सेवेसाठी मंचर ग्रामपंचायतीने 20 लाख रुपयांची तरतूद करून अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. लवकरच रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. अत्याधुनिक रुग्णवाहिका घेणारी मंचर ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलीच ग्रामपंचायत आहे, असा दावा सरपंच दत्ता गांजाळे यांनी केला आहे.
आंबेगाव, जुन्नर तालुक्यामधील अत्यवस्थ रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचा फायदा होणार आहे. रुग्णवाहिकेमध्ये उपचारासाठी डॉक्टर हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील असणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, मंचरचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह नागरिकांच्या सहकार्याने रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
आंबेगाव तालुक्यात सर्व लाईफ सपोर्टसहित व्हेंटिलेटर असलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी लवकरच दाखल होणार आहे, असे सरपंच गांजाळे यांनी सांगितले.