कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील शेगूडजवळच्या फुंदेवाडीत बिबट्याने युवकाला ठार केल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. तालुक्याच्या विविध भागांत बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामस्थांकडून वनविभागाला दिली जात आहे. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची बिबट्याच्या शोधासाठी धावाधाव सुरू आहे.
धालवडी येथील शंकर बाळू पवार व संदीप तुकाराम होळकर यांनी उसाच्या शेतात बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वनसंरक्षक रवींद्र कोळी व एस. एस. साखरे हे वनमजूर एम. एम. बळे, डी. बी. गुंड यांच्यासह धालवडी येथे गेले. उसात बिबट्या असल्याचे यावेळी त्यांना ग्रामस्थांनी सांगितले.
उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्याचा शोध घेणे कर्मचाऱ्यांना अडचणीचे झाले. त्यामुळे उभ्या उसात जेसीबी घालून बिबट्याचा शोध घेण्यात आला. उसाच्या बाजूने मोठ्या संख्येने शेतकरी काठ्या घेवून उभे होते. मात्र जेसीबीने शोधाशोध घेऊनही बिबट्या आढळून आला नाही, अशी माहिती वनसंरक्षक रवींद्र कोळी यांनी दिली.