शाळेतील मध्यान्ह भोजनात आढळली उंदराची विष्ठा

पालिकेच्या शाळेमधील प्रकार; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
पिंपरी(प्रतिनिधी) – महापालिकेच्या काळभोर येथील माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात उंदराची विष्ठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या शाळेत ठेकेदारांमार्फत मध्यान्ह भोजन पुरविले जात असून आज शाळेमध्ये आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे, महापालिका प्रशासन शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळत आहे का? असा प्रश्‍न राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर माध्यमिक शाळेत 87 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन व्यवस्था करण्यात येते. पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना मध्यान्ह भोजन व्यवस्था पुरण्यासाठी इस्कॉन आणि काही महिला बचत गटांना हा ठेका देण्यात आलेला आहे.

आज नेहमीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिल्यानंतर आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांला भोजनामध्ये उंदराची विष्ठा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर एकच खळबळ माजली. संबंधित ठेका हा भाजपाच्या नगरसेविकेशी संबंधित असल्यामुळे प्रकार दाबवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र विद्यार्थ्यांनी तसेच काही पालकांनी ठाम भूमिका घेत या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून संबंधितांचा भोजन पुरवठा बंद करण्याची मागणी केली आहे.

ठेका भाजप नगरसेविकेच्या बचत गटाकडे?
महापालिकेच्या मध्यान्ह भोजन व्यवस्था पुरण्यासाठी दिलेला ठेका हा सत्ताधारी भाजप नगरसेविकेच्या बचत गटाकडे असल्याची माहिती समोर आली आहे. या नगरसेविकेकडे जवळपास 30 ते 35 शाळांमध्ये भोजन व्यवस्था पुरविण्याचा ठेका आहे. संबंधित नगरसेविकेच्या बचत गटाकडून हे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

चौकशी अहवाल मागविणार
या प्रकाराची गंभीर दखल घेत शिक्षण समिती सभापती मनिषा पवार यांनी संबंधित महिला बचत गटाला तात्काळ नोटीस काढली आहे. तर प्रशासनाने या घटनेचा अहवाला सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

कारवाईची मागणी
हा प्रकारच अत्यंत दुर्देवी असून या प्रकाराची सखोल चौकशी करुन ठेकेदार महिला बचत गटावर कारवाई करावी, अशी तक्रार राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर, शिक्षण प्रशासन अधिकारी ज्योस्त्ना शिंदे यांच्याकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.