सातबारा उतारा वाचणे झाले सोपे

राज्यात उताऱ्यामध्ये एकसमानता
पिकाचे नेमके क्षेत्र कळणार : चुकीच्या नोंदी थांबणार

पुणे- राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सातबारा उतारे लिहण्याच्या पद्धतीमध्ये एकसमानता आणली आहे. त्यामुळे राज्यातील सातबारा उतारा वाचणे सोपे झाले आहे. राज्यात कोणत्या पिकांचे किती क्षेत्र हे कळणार असून सातबारा उताऱ्यामध्ये चुकीच्या नोंदी थांबणार आहेत.

राज्यात प्रत्येक विभागामध्ये सातबारा उतारा लिहण्याच्या पद्धतीमध्ये विविधता आहे. सातबारा उताऱ्यामधील चुकीच्या नोंदी पध्दतीमुळे दावे दाखल होतात. तसेच पीक पाहणीच्या नोंदी वेगवेगळ्या असल्याने कोणत्या पिकांची किती क्षेत्रावर पेरणी झाली आहे, याचीही माहिती नीट उपलब्ध होत नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सातबारा उतारे लिहण्याच्या पद्धतीमध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील काही वर्षांपासून यावर काम सुरू होते. आता याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

सातबारा उतारा हा जमीन मालकी संदर्भात महत्त्वाचा पुरावा समजला जातो. सातबारा उताऱ्यावर विविध प्रकारच्या नोंदी असतात. यामध्ये प्रामुख्याने गावाचे नाव, भोगवटदाराचे नाव, गट क्रमांक अथवा सर्व्हे नंबर, भू-धारणा पद्धती, जमिनीचे क्षेत्र, कुळाचे नाव, बोजा, अटी व शर्ती, तारण ठेवली आहे का, पिकाखालील क्षेत्राचा तपशील, जिरायत की बागायती आदींची नोंद असते. या सर्वांच्या नोंदी असल्यामुळे सातबारा उताऱ्याला अन्यन्य साधारण महत्त्व आहे.

सातबारा नोंदीच्या पद्धती
सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद घ्यायची असेल तर, मयत व्यक्‍तीच्या नावाला कंस करतात. मात्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मयत व्यक्‍तीच्या नावाला काट मारतात किंवा गोल केला जातो. अमरावती भागामध्ये 6/2 या नमुन्यामध्ये सातबारा लिहला जातो. 6 नंबर म्हणजे गाव नमुना आणि 2 म्हणजे बिगर शेती नोंद अशा पद्धतीनुसार या भागात सातबारा उतारा लिहला जातो. मयत व्यक्‍तीनंतर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सर्व वारसांची नोंद घेण्याऐवजी फक्‍त थोरल्या मुलाचीच नोंद सातबारा उताऱ्यावर लिहली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.