न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील रस्त्यांवर सध्या दंगलीचे वातावरण पाहायला मिळत आहे. एका सोशल मीडिया सेलिब्रिटींच्या एका पोस्टमुळे शहरात अचानक दंगल उसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात तरुणांचा मोठा जमाव रस्त्यावर जमला होता आणि काही वेळातच हाणामारी आणि दगडफेक सुरू झाली. अनेक लोक जखमी झाले असून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध यूट्यूबर काई सेनेटने इंस्टाग्रामवर लाइव्ह केले आणि सांगितले की, तो लोअर मॅनहॅटनमध्ये त्याच्या चाहत्यांना भेटेल आणि त्यांना भेटवस्तू देईल. या भेटवस्तूंमध्ये, काई सेनेटने प्ले स्टेशन देण्याबद्दल सांगितले होते. काई सेनेटचा हा व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल झाला आणि युट्युबरने नमूद केलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण जमा होऊ लागले. काई सेनेटचे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत.
यूएस मीडियानुसार, सुमारे 2,000 तरुणांचा जमाव लोअर मॅनहॅटनमधील युनियन स्क्वेअरवर प्रसिद्ध YouTuberला पाहण्यासाठी आणि भेटवस्तू घेण्यासाठी जमला होता. हजारोंचा जमाव जमला असताना काही तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. दंगलीची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
न्यूयॉर्क शहराचे पोलिस प्रमुख जेफ्री माडेरे यांनी या सर्व प्रकाविषयी माहिती देताना, ‘परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अनेक लोक जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दंगलीच्या आरोपाखाली अनेक तरुणांना अटक करण्यात आली आहे.”