मलठण – शेतकरी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे गाईची तसेच दावणीला असलेल्या इतर जनावरांची काळजी घेत असतात. शेतकरी आणि जनावरांचे प्रेम नेहमीच पाहायला मिळते. नुकतेच मलठण येथील भरतसिंह परदेशी यांनी देशी गोवंशाच्या पहिल्या वेताच्या गीर जातीच्या गायीचे डोहाळे जेवण मोठ्या धुमधडाक्यात केले आहे. या अनोख्या मुक्या प्रेमापोटी शेतकऱ्याच्या आस्थेची मलठण परिसरात चर्चा रंगली आहे.
ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. आर्थिक स्थिती भक्कम करण्यात याचा वाटा मोठा आहे. देशी गायीच्या दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेण व गोमूत्र याचा मोठा फायदा होतो. एकंदरीत बळीराजाला गाई ही कामधेनुच आहे. हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मलठण येथील भरतसिंह परदेशी यांनी देशी गायीचा सांभाळ केला आहे. तिची गर्भधारणा झाल्यानंतर सातव्या महिन्यात तिचे डोहाळे जेवण करण्याचा निश्चय केला. गायीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी भरतसिंह परदेशी यांनी डोहाळे जेवणादिवशी गोपूजन करण्यात आले. यावेळी किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांना महाप्रसाद देखील देण्यात आला. परदेशी यांनी शेतकऱ्यांपुढे चांगला आदर्श ठेवला आहे.