वडूज, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील वडूज परिसरात अनेक गावांत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भजन, कीर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाकेश्वर येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हभप उमेश दशरथे यांचे रामजन्मावर कीर्तन झाले. या किर्तनात त्यांनी प्रभू रामचंद्राचा संपूर्ण चरित्र सांगताना विविध व्यावहारिक उदाहरणे दिली. तर लोकांनी प्रभू रामचद्रांच्या विचाराचे आचरण करावे असे आवाहन केले.
प्रतिमेवर फुले अर्पण केल्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी प्रभू रामचंद्राच्या मुर्तीची रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी ठिकठिकाणी रथाचे औक्षण केले. यावेळी भाविकांनी हजारो रुपयांची देणगी अर्पण केली.
डूज येथील बाजार पेठेतील राम मंदिरात हभप कुंभार सांगली यांचे किर्तन तर सिध्देश्वर कुरोली येथे ह.भ.प. विलास गरवारे यांचे नारदीय किर्तन झाले. नायकाचीवाडी येथे हभप सोमनाथ गायकवाड वाठार यांचे किर्तन झाले. या सर्वच ठिकाणी एकाच वेळी प्रभू रामचंद्राच्या नावाचा जयजयकार केल्याने अवघी आयोद्या नगरी अवतरल्याचा भास झाला.
दरम्यान, रामनवमी उत्सवानिमित्त वाकेश्वर येथे संपुर्ण मंदिर परिसराची रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्यात आले होते. तर मुर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रामनवमी यात्रेच्या निमित्ताने खेळणी, पाळणे तसेच मेवा मिठाईची दुकाने दाखल झाली होती.