पर्थ – ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवर सुमारे 100 पायलट व्हेल येऊन पडल्याचे आढळून आले आहे. या व्हेलना जीवदान देण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या 100 पायलट व्हेलपैकी किमान 50 व्हेलचा मृत्यू झाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडील अल्बानी शहराजवळच्या किनारपट्टीवर हे व्हेल आढळून आले आहेत. हे व्हेल मंगळवारी सकाळी किनाऱ्याजवळच्या पाण्यामध्ये पोहत असल्याचे बघितले गेले होते. ते किनाऱ्यापासून खूपच जवळ आले होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जाऊ लागली होती. मात्र संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास व्हेलची एक रांगच किनाऱ्यावर येऊन पडल्याचे आढळून आले होते.
हे व्हेल इतक्या मोठ्या संख्येने किनाऱ्यावर कसे येऊन पडले असावेत, याबाबत तज्ज्ञांमध्ये संभ्रम आहे. यामधील 52 व्हेलचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 45 व्हेलना वाचवण्यासाठी पुन्हा पाण्यात ढकलले जात आहे. या व्हेलना वाचवण्याचे काम रात्रभर सुरू होते. हे व्हेल जिवंत राहतील अशी आशा व्यक्त होते आहे.