नवी दिल्ली – भारतात पहिल्यांदाच डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी एक नवा कायदा येणार आहे. प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा करण्याची प्रक्रियाही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे.
या नवीन विधेयकामध्ये डिजिटल न्यूज मीडियाचासुद्धा समावेश करण्यात येणार आहे. देशातील कायद्यांमध्ये डिजिटल न्यूज मीडियासाठी करण्यात येणारा हा पहिलाच कायदा असेल. हा कायदा मंजूर झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत वेबसाइटची नोंदणी करावी लागणार आहे.
वेबसाइटच्या मालकांना त्यांच्या वेबसाइटची नोंदणी प्रेस रजिस्टार जनरल यांच्याकडे करावी लागेल. त्याचबरोबर कोणत्याही वेबसाइटवर कोणत्याही प्रकारची कारवाई करणायचे सर्व अधिकारसुद्धा त्यांच्याचकडे असतील आणि याच अधिकारानुसार ते कोणत्याही वेबसाइटची मान्यतासुद्धा रद्द करू शकतात किंवा त्यांना दंडही आकारू शकतात. त्याचबरोबर कोणतीही तक्रार निवारण्यासाठी मंडळदेखील स्थापन केले जाणार आहे. याचे प्रमुख हे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य अधिकारी हेच असतील.
यापूर्वी डिजिटल न्यूज मीडियावर कोणत्याही प्रकारची बंधने नव्हती. पण आता हे सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर सर्व
न्यूज वेबसाइट या कायद्याच्या चौकटीत येणार आहे. 2019मध्ये सरकारने या नवीन कायद्यासंदर्भांत मसुदा तयार केला होता. यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टिका सुद्धा झाली आहे. त्याचबरोबर सरकार डिजिटल मीडियावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सुद्धा अनेकांकडून करण्यात आला होता.