मृत कर्मचाऱ्यांच्या विम्यासाठी अटींचा डोंगर

विमा मिळविण्यासाठी कठोर नियमावली; आतापर्यंत पालिकेच्या आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू 

पिंपरी – महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कोविड ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचा करोनाने मृत्यू झाला तर त्याला एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. मात्र मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना विम्याचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने किचकट अटींचा डोंगर उभा केला आहे. 

त्यामुळे विम्याचा लाभ घेण्यासाठी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू अटी-शर्ती पाळूनच झाला आहे, हे दाखवून देण्यासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागणार आहे. शहरामध्ये करोनाचा संसर्ग वाढत आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 70 ते 80 कर्मचारी बाधित झाले आहेत. तर आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

करोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे. यामध्ये पन्नास लाख रुपये राज्य शासनाचे असून महापालिकेचे पन्नास लाख रुपये आहेत. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याने पालिकेची नौकरी स्वीकारल्यास राज्य शासनाचे पन्नास आणि महापालिकेचे 25 लाख रुपये असे 75 लाखांचे कवच आहे. मात्र विम्याचा लाभ मिळविण्यासाठी विविध अटी घालण्यात आल्या आहेत.

अटींचे व शर्तींचे पालन करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे ज्या कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तो 14 दिवस आधी ड्युटीवर पाहिजे. तसेच ज्या कर्मचाऱ्याला करोनाची ड्युटी आहे. त्याला कामावर असतानाच्या कालवधीमध्ये लागण होऊन मृत्यू झाला तरच त्याला लाभ घेता येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने 28 मार्च रोजी अध्यादेश काढला. त्याला अनुसरून राज्य सरकारनेही 29 मे रोजी आदेशाद्वारे अटी घालून दिल्या आहेत. या किचकट अटीमुळे मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना विम्याचा लाभ मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

केंद्र व राज्य सरकारने घातलेल्या अटी
1) कर्मचारी रुग्णालयात दाखल होण्याच्या आधी 14 दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर पाहिजे.
2) मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू करोनानेच झाला आहे, याबाबत नोंदणीकृत रुग्णालयातून प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.
3) यामध्ये कंत्राटी, बाह्यस्त्रोताद्वारे घेतलेले, रोजंदारी, तदर्थ, मानसेवी अशा कर्मचाऱ्यांचा
समावेश असेल.

आपल्या आठ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. विमा मिळण्यासंदर्भात कामगार कल्याण मंडळाकडे पाठपुरावा सुरू आहे. संबंधित विभागांनीही त्वरित माहिती देणे आवश्‍यक आहे. कर्मचारी करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामध्येही जीवाची पर्वा न करता काम करत आहे. दुर्देवाने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळालाच पाहिजे. कर्मचारी कशाचीही पर्वा न करता काम करत आहेत.
– अंबर चिंचवडे,अध्यक्ष, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघ 

Leave A Reply

Your email address will not be published.