Nagpur Blast : नागपूरमध्ये बाजारगावमध्ये स्फोटके बनविणाऱ्या एका फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे. स्फोट झालेल्या सोलार या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो. एकूण 9 कर्मचाऱ्यांच्या या स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये 6 पुरुष तर 3 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर काही जण यात अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
या स्फोटाचे नेमके कारण समोर आले नसून पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये दारुगोळा तयार करण्याचं काम केलं जात. हा दारुगोळा भारतीय सैन्याला पुरवला जातो. दारूगोळा बनवण्याचे काम सुरु असतानाच काही वेळापूर्वी हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेनंतर तातडीने जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील कंपनीबाहेर झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.