लखनौ – उत्तरप्रदेशातील बाहुबली राजकारणी मुख्तार अन्सारी याचे रूग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या मृत्यूविषयी कुटूंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर, उत्तरप्रदेशच्या बांदामधील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. (A judicial inquiry will be held into the death of Mukhtar Ansari)
चौकशीची जबाबदारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गरिमा सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांना चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे.
प्रदीर्घ काळापासून अटकेत असणाऱ्या अन्सारीला बांदा तुरूंगात ठेवण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्याला गुरूवारी बांद्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले. त्या रूग्णालयातील डॉक्टरांनी रात्री त्याचे निधन झाल्याची माहिती दिली.