कुडाळ, दि. 14 (प्रतिनिधी) -जावळी तालुक्यातील करंदोशी गावचे जवान तेजस लहूराज मानकर (वय 22) यांना पंजाबमधील भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावत असताना डोक्याला गोळी लागली होती. त्याला उपचारासाठी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या उमद्या जवानाच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यासह संपूर्ण जावळी तालुक्यावर शोककळा पसरली.
तेजस यांना गोळी कशी लागली याबाबत पोलीस शोध घेत आहेत. जवान तेजसचे वडील सैन्यदलात मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तर भाऊ सैन्यदलात कर्नल पदावर कार्यरत आहे. तसेच चुलते शशिकांत मानकर हेसुद्धा सैन्य दलात सेवा बजावत आहेत. आई मनीषा मानकर गृहिणी आहेत. सैन्य दलातून देशसेवा करण्याची परंपरा मानकर कुटुंबीयांत आहे. दोन वर्षापूर्वी तेजस सैन्य दलात दाखल झाले. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांची पंजाबमधील भटिंडा येथे नियुक्ती करण्यात आली होती.
याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजस नुकताच यात्रेनिमित्त सुट्टी घेऊन गावी आला होता. पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी तो पाचच दिवसांपूर्वी गेला होता.
यात्रेदरम्यान तेजसने नातेवाइक आणि मित्र परिवारासोबत केलेल्या मौजमजा व गप्पागोष्टीच्या आठवणी ताज्या असतानाच त्याच मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच सारा परिसर गहिवरला. तेजसचे प्राथमिक शिक्षण गावी झाले. अत्यंत हुशार, हजरजाबाबी व मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे त्याचा मित्र परिवार मोठा आहे.
नंतर वडिलांच्या सेवा काळात त्यांच्यासोबत विविध ठिकाणी त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वडील व भावाप्रमाणे आपणही आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तेजस दोन वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाले. ग्रामस्थ तेजस यांचे पार्थिव येण्याची प्रतीक्षा करत आहेत. अत्यंत जड अंतःकरणाने तेजस यांच्या अंतिम निरोपाची तयारी त्याचे मित्र व ग्रामस्थ करत आहेत.