खानापूर : घराशेजारी अंगणात खेळताना सर्पदंश झाल्याने खानापूर ता.भोर येथील अंगणवाडीत शिकणारा चिमुकला रघुनाथ मारुती भालेराव (वय -५) याचा उपचारादरम्यान बुधवार दि.९ मृत्यू झाल्याची घटना घडली.
भोर तालुक्यात पाऊसाच्या विश्रांतीने सध्या वातावरणात उकाडा फार वाढला आहे. परिणामी सर्प गारव्यासाठी गवत-वेलींचा आधार घेत आहेत. त्यातच रघुनाथ भालेराव हा चिमुकला खानापूर ता.भोर येथील घराशेजारील अंगणात मोठ्या बहिणी बरोबर खेळत होता. यावेळी अचानक गवतात असलेल्या सर्पाने दंश केला. मात्र रघुनाथ हा वयाने लहान व नकळत असल्याने त्याला सर्पदंश झाल्याचे समजून आले नाही.
रात्री उशिरा त्याला त्रास होऊ लागल्याने भोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रघुनाथ याला सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ या चिमुकल्याला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
चिमुकल्यांची काळजी घेणे गरजेचे
सध्या वातावरणात उकडा मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्प घराच्या अवतीभवती गारव्यासाठी फिरत असल्याचे चित्र आहे.लहान मुलांना सर्प म्हणजे काय कळत नसल्याने अचानकपणे गवत वेलीमध्ये खेळताना सर्पदंश झाला तर मोठी घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे चिमुकल्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.