न्हावरे -उरळगाव (ता. शिरूर) येथील वनविभागाच्या जमिनी लगत भीमानदीच्या पात्रात एका 37 वर्षीय व्यक्तीचा मुंडके (शीर) नसलेला मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी दिली. बापू ताऊजी शिंदे (वय 37, रा. मलठण, शिंदेवाडी, ता.शिरूर), असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बापू शिंदे हे रविवार (दि. 3) पासून बेपत्ता असल्याची नोंद टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्रात दिली होती. तर शुक्रवारी (दि. 8) त्यांचा मृतदेह उरळगाव येथील भीमानदीच्या पात्रतील पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला.
हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत हात, पाय व धडाचा भाग असलेला व मुंडक्याचा भाग नसलेल्या अवस्थेत होता. तर शनिवारी (दि. 9) संध्याकाळी उशिरा न्हावरे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून बापू शिंदे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिला.