तमिळनाडूत एका महिलेच्या घरी जबरी चोरी
चेन्नई – माकडांचा उच्छाद नागरिकांना काही नवा नाही. मात्र, जर या माकडांची संपूर्ण टोळीच चोरी करायला लागली तर काय होईल याचा प्रत्यय येणारी घटना येथे घडली आहे. येथील विरमगुंडी जिल्ह्यात एका महिलेच्या घरात या टोळीने जबरी चोरी केली असून या घटनेवर अनेकांनी सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
पर्यटन करायला गेल्यावर अनेक ठिकाणी अशी माकडे त्रास देताना आपण पाहातो. मात्र, या गावात माकडांच्या टोळीने एका महिलेच्या घरावरच दरोडा टाकला असून लाखोंचे दागिने व रोख रक्कम पळवून नेली आहे. या महिलेचे दागिने तसेच रोख 25 हजार रुपयांची रक्कम माकडांच्या टोळीने पळवली. सरथंबल असे या महिलेचे नाव असून ती एकटीच राहते.
बुधवारी घरात कपडे धूत असताना हा प्रकार घडला. माकडांच्या टोळीने महिलेच्या घरात धुमाकूळ घालत अन्नधान्याची नासाडी तर केलीच. मात्र, घरात अडकवलेल्या एका पिशवीत असलेले दागिने व रक्कम घेउन पोबारा केला. दागिने आणि पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने घराबाहेर कोणी व्यक्ती आहे का याची पाहणी केल्यावर ही माकडांची टोळी तिला दिसली व त्यांच्यातील एकाकडे तिची पिशवी असल्याचेही दिसून आले. तिने काही रहिवाशांच्या मदतीने माकडांच्या ताब्यातील ऐवज परत मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र, हा ऐवज घेऊन माकडांची टोळी गायब झाली आहे.