पुणे : करोना रूग्णांच्या उपचारासाठी तब्बल 300 कोटीचे हॅस्पीटल उभारण्यासाठी निघालेल्या आरोग्य विभागाकडे घरात मृत्यू झालेल्या 73 वर्षीय करोनाबाधिताचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिकाच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना नातेवाईकांनी याची कल्पना देऊनही तब्बल 10 तासांहून अधिक मृतदेह घरातच पडून होता. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.
धायरी मधील सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत हे 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटूंबासह राहत होते. त्यांचा करोनाचा अहवाल मंगळवारी रात्री पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टरने या रूग्णास दुसऱ्या दिवशी तपासणी केल्यानंतर रूग्णालयात दाखल होण्यास सांगितले. त्यानुसार, डॉक्टर बुधवारी दुपारी येणार असल्याने या व्यक्तीच्या कुटूंबातील इतर सदस्य सकाळी करोना चाचणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी या ज्येष्ट नागरिकाची पत्नी घरी होती.
दुपारी त्यांचे फॅमिली डॉक्टर दुपारी 1च्या सुमारास घरी तपासणीसाठी आल्यानंतर त्यांनी ही 73 वर्षीय व्यक्ती मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर चाचणीसाठी नमुने देऊन घरी आलेल्या नातेवाईकांना हा प्रकार समजताच त्यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाशी संपर्क साधला, त्यानंतर पालिकेचे कर्मचारी या व्यक्तीच्या घरी येऊन गेले. मात्र, त्यांनी रूग्णवाहीका उपलब्ध झाल्यावर मृतदेह घेऊन जातो म्हणून सांगितले, मात्र, नंतर कोणीच आले नाही त्यानंतर नातेवाईकांनी तसेच आसपासच्या लोकांनी स्थानिक पोलिसांशीही संपर्क साधला, पोलिसांनीही आरोग्य यंत्रणेशी संर्पक साधला, मात्र, सायंकाळी 9 वाजता त्यांना रूग्णवाहीका
सहा तासात अंत्यविधी होणे अपेक्षित
दरम्यान, केंद्रशासनाने करोनाबाधितांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी सहा तासात करणे प्रशासकीय यंत्रणेस बंधनकारक केले आहे. मात्र, हा प्रकार पाहता जवळपास दहा तासांहून अधिक या व्यक्तीचा मृतदेह घरातच असल्याने सोसयाटीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच नातेवाईकही घाबरलेल्या अवस्थेत होते. तर या प्रकरणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
———————