भवानीनगर -तीन एकर क्षेत्रातील मका पिकाचे 1 लाख 20 हजार रुपये एवढे उत्पन्न मिळत असताना केवळ गावातील जनावरांना लॉकडाऊनच्या काळात हिरवा चारा मिळावा, यासाठी येथील शेतकरी गिरीराज अजित सपकळ यांनी जनावरांसाठी मोफत दिली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या काळात अनेक ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी कित्येक सामाजिक संस्थांनी, सरकारने, तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या नागरिकांनी गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. परंतु याच लॉकडाऊनच्या काळात चारा टंचाईमुळे अनेक ठिकाणी जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.जनावरांना या काळात चारा मिळणे कठीण झाले होते.
अशावेळी सपकळवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी गिरीराज अजित सपकळ यांनी आपल्या शेतातील तीन एकर मका जनावरांचा विचार करून व त्यांना हिरवा चारा मिळावा यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता मोफत दिली आहे. अशा प्रकारचे समाजामध्ये असेच दानशूर लोक आहेत. या दानशूर लोकांमुळेच हे जग तरले आहे. अशीही भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.