कोथिंबीर, मेथी ५० रूपये; कांदापात, पालक, शेपू ३० ते ४० रुपये जुडी
पुणे(प्रतिनिधी) – मार्केट यार्डातील भाजीपाला विभाग बंद आहे. सध्या उपबाजारात भाजीपाल्याची आवक होत आहे. तेथून आणि लगत असलेल्या ग्रामीण भागातून शहरात पालेभाज्यांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्यामुळे त सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत.
किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीरीच्या जुडीची ५० रुपये भावाने विक्री होत आहे. तर, अन्य पालेभाज्यांच्या प्रतिजुडीस ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश मालाची प्रतवारी ढासळी असून वाढलेल्या भावमुळे भाज्या खरेदी करताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा बसावा यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे गुलटेकडी मार्केटयार्ड गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी बाजारात माल विक्रीला आणणे थांबविले आहे. परिणामी, शहरातील वेगवेगळ्या भागात भाज्यांची विक्री करणाऱ्याला भाज्या मिळत नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे सर्व पेठा, शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, पर्वती, येरवडा, कोरेगावपार्क, कर्वेनगर, बालाजीनगर, पद्मावती, पुणे स्टेशन परिसरात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही अव्वाच्या सव्वा भावाने भाज्यांची विक्री करीत आहेत. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
पालेभाज्यांचे गड्डीचे भाव…
कोथिंबीर ५०
मेथी ५०
मुळा ४०
मेथी ३०
कांदापात ३०
अंबाडी ३०
चाकवत ३०