सांगली – मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना भोगावी लागल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील शिराळा तालुक्यातील ही घटना आहे. प्रेम प्रकरणातून मुलाच्या आई-वडिलांना वीजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाम करण्यात आली. मारहाणीत मुलाचे वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी १२ जणांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेम संबंधातून मुलीचे आई वडील,चुलत चुलते आणि नातेवाईकांनी मुलाच्या पालकांना मारहाण केली.
दादासाहेब रामचंद्र चौगुले असे मयताचे नाव आहे. या घटनेने शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यात सात जण अटकेत आहेत. यामध्ये मुलीचे आई-वडील, चुलता-चुलती, दाजी यांचा समावेश आहे.
मयत दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले.
आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेलाय, ते कुठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना वीजेच्या खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत दादासाहेब चौगुले हे बेशुद्ध झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.