पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय नेत्यांसह सराईत गुन्हेगारही सक्रीय झाले आहेत. सराईत गुन्हेगाराचे फ्लेक्स एकाने लावले. फलक लावून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार आणि फलक लावणारा या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 22) ही कारवाई करण्यात आली आहे.
महेश डोंगरे (रा. भोसरी) आणि सुनील चव्हाण (रा. दिघी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार दत्तात्रय बाळासाहेब कांबळे (वय 42) यांनी मंगळवारी (दि. 22) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निवडणूका जवळ आल्याने काही गुन्हेगारांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. तर काहींनी आपली दहशत परिसरात राहावी यासाठी बॅनरबाजी सुरू केली आहे.
भोसरी आणि इतर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार महेश डोंगरे याचे फ्लेक्स सुनील चव्हाण याने दहशत निर्माण व्हावी यासाठी भोसरी परिसरातील मुरकुटे कॉर्नर, चक्रपाणी वसाहत लावले. हे फलक लावण्यासाठी महेश डोंगरे आणि सुनील चव्हाण या दोघांनीही महापालिकेची अथवा पोलिसांची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती.
याबाबतची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी त्वरीत ते फ्लेक्स हटविले आणि डोंगरे आणि चव्हाण या दोघांवर महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम कलम 3 तसेच क्रिमिनल लॉ अमें. ऍक्ट कलम 7 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 33 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली.