मंचर (पुणे) -चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता बिबट्याने संतोष चिमणराव थोरात (वय 45) या तरुणावर हल्ला केला. थोरात यांच्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेतली. मात्र संरक्षणासाठी त्यांनी हात मारल्याने ते बालंबाल बचावले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात थोरात यांची हाताची करंगळी व मांडीला बिबट्याचे दात लागले आहेत. यानंतर एका शेतकऱ्याच्या दुचाकीचा पाठलाग याच बिबट्याने केला आहे.
चांडोली बुद्रुक येथील वेताळमळा येथे राहणारे संतोष थोरात हे लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेत राजगुरुनगर शाखेत काम करतात. आज सायंकाळी बॅंकेतील काम संपवून ते वेताळमळा येथील घरी परतले होते. मंचर शहरात काम असल्याने ते पुन्हा माघारी निघाले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. अंधार पडल्याने बिबट्याने रस्त्यावर येऊन हल्ला केला. बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली. तोच थोरात यांनी हाताने त्याला फटका मारला; मात्र यादरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात त्यांची पॅन्ट फाटली गेली.
करंगळी व मांडीला बिबट्याचा पंजा लागला आहे. हल्ल्यात थोरात जखमी झाले; मात्र घाबरलेले थोरात यांनी दुचाकी न थांबवता थेट मंचर येथील वृंदावन सोसायटीत आले. तेथे माजी ग्रामपंचायत सदस्य अजित बेंडे, अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन, अवधूत शेटे, निलेश कोकणे, उदयकुमार लोंढे, केतन लोंढे यांनी थोरात यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेले. वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान याचवेळी वेताळमळा येथे लक्ष्मण नाथा चौरे या शेतकऱ्याच्या दुचाकीचा पाठलाग या बिबट्याने केला आहे. गाडी वेगात पळविल्याने चौरे सुद्धा वाचले आहेत. चांडोली बुद्रुक परिसरात बिबट्याचा उपद्रव अनेक दिवसांपासून सुरू आहे.
- दोन दिवसांपूर्वी एक बिबट्या जेरबंद
पंधरा दिवसांपूर्वी जयदीप थोरात व ओंकार थोरात या तरुणांवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर दोन दिवसापूर्वी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. असे असताना थोरात यांच्यावरील बिबट्याच्या हल्ल्याने माणसावर हल्ला करणारा बिबट्या अद्याप मोकाट असल्याचे दिसून आले आहे. वनखात्याने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी युवासेना जिल्हाधिकारी प्रवीण थोरात यांनी केली आहे.