मंचर (प्रतिनिधी) – मतदार चिठ्ठीपासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करुन मतदार चिठ्ठीचे वाटप करावे, अशी सूचना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सोमवारी केली.
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील कवयित्री शांता शेळके सभागृहात शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत आंबेगाव विधानसभा मतदासंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करतानात ते बोलत होते. अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, निवडणूक नायब तहसीलदार सचिन वाघ, अर्चना कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेमधे मतदारांना मतदार चिठ्ठी वाटप करणे हे महत्त्वाचे कार्य असल्याने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे पर्यवेक्षक व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदार चिठ्ठी अन्य व्यक्तीकडे न देता मतदार किंवा कुटुंब प्रमुखाकडे देण्याची दक्षता घ्यावी.
यासाठी सुक्ष्म नियोजन करुन समन्वयाने मतदार चिठ्ठीचे वाटप करावे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कामकाज जबाबदारीने पार पाडावे. कोणताही मतदार मतदार चिठीवाचून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे शिंदे यांनी सांगितले. प्रशिक्षणात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते.