नारायणगाव, {मंगेस रत्नाकर} – जुन्नर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु धरणांच्या तालुक्यातील कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथाळणे, माळीवाडी, डोमसेवाडी, मुठेवाडी, बांगरवाडी डोंगरदर्या असलेल्या गावातील आदिवासी महिलांचा वर्षानुवषेर्र् पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष पाहायला मिळतो.
याच गावांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून हर घर जल, हर घर नल योजनेअंतर्गत पाण्यासाठी पाइपलाइन टाकल्या जात आहेत. परंतु आडातच नसेल तर पोहर्यात कोठून येणार या भावनेने नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कोठून येणार असा उद्विग्न प्रश्न आदिवासी महिला विचारत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योजना राबविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
फक्त मतांच्या भिकेसाठीच येतात
जुन्नरच्या उत्तरेकडील दहा हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथाळणे, माळीवाडी, डोमसेवाडी, मुठेवाडी, बांगरवाडी आदिवासी गावे आजही देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात तहानलेली दिसून येत आहे. निवडणुका आल्यानंतर लोकप्रतिनिधी फक्त मतांची भीक मागण्यासाठीच आमच्याकडे येतात अन्यथा आमच्या आदिवासी गावांकडे ढुंकूनही पाहत नाही अशी संतप्त भावना आदिवासीं महिलांनी बोलून दाखवली.
पेसा कायद्या अंतर्गत कोपरे जांभूळशी व मांडवे मुथळणे दोन ग्रुप ग्रामपंचायती येत असून मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मांडवी नदीवर एमआय टँक बांधून देण्याची मागणी अनेक वर्षापासून करीत असून शासन दरबारी पाठपुरावा देखील केला आहे. परंतु समस्या सुटता सुटत नाही. कारण जुन्नर तालुक्यात पिंपळगाव जोगा, माणिकडोह, चिल्हेवाडी ,येडगाव ,वडज ही पाच मोठी धरणे असल्याने कृष्णा खोरे लवादामुळे परवानगी मिळत नाही.- रोहिणी माळी, सरपंच, कोपरे जांभूळशी
माझा जन्म फक्त पाणी वाहण्यासाठीच झाला आहे की काय कारण सकाळी उठल्यापासून सारं आयुष्य पाण्याभोवतीच फिरत असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या डोक्यात पाण्याचाच विचार असतो. माझ्यासह अनेक आदिवासी महिलांचा दिवसातला जास्तीत जास्त वेळ पाणी वाहण्यात जातो.
यमुना बांगर, आदिवासी महिला, काठेवाडी
जुन्नरच्या हद्दीवरील डोंगरदर्यात वसलेले कोपरे, मांडवे यासह बारा वाड्या वस्त्यांवरील पाणी प्रश्नाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रामाणिक इच्छा प्रशासनाला दिसत नाही. शेतकरी पावसाच्या पाण्यावरची कोरडवाहू शेती करत असल्याने गावात फक्त भाताच्या पिकाची लागवड होते. दसरा-दिवाळीनंतर रोजगाराच्या शोधात स्थानिक गावकरी मजुरीसाठी बनकर फाटा, ओतूर, जुन्नर नारायणगाव आदी गावांकडे स्थलांतर करतात. -सुनील माळी, सामाजिक कार्यकर्ता
सध्याची परिस्थिती
कोपरे, जांभूळशी, मांडवे, मुथळणे गावांसाठी पंचायत समितीने 10 हजार लिटर टँकरच्या दोन खेपा सुरू करून 20 हजार लिटर पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती; परंतु पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने आमदार अतुल बेनके यांनी आणखी एक जादा टँकर वाढवून 40 हजार लिटर पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे कोपरे जांभूळशीचे शंकर माळी सांगतात.
याशिवाय बेनके यांनी हायर कंपनीच्या माध्यमातून आठ हजार लिटर तर आढळराव पाटलांनी खासगी टँकरच्या माध्यमातून चार हजार लिटर पाण्याची सोय केली असल्याचे सांगितले.