पुणे (प्रभात वृत्तसेवा) – मित्राला भेटण्यासाठी मुंबई येथे निघालेल्या एका 14 वर्षीय मुलीवर प्रवासासाठी पैसे देण्याचे आमिषाने आठ ते नऊ जणांनी सलग दोन दिवस सामूहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहरातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व अज्ञात ठिकाणी नेऊन संबंधीत मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तब्बल दोन दिवस मुलीवर नराधमांनी अत्याचार केले आहेत. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसऱ्या दिवसी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला.
पिडीत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानतंर पोलिसांच्या तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीला वानवडी पोलिसांनी चंदीगड येथून ताब्यात घेतल्यानंतर तिने ही आपबिती सांगितली.
मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय.27,रा. वैदुवाडी हडपसर),अकबर उमर शेख (वय.32, रा. मंगळवार पेठ जुना बाजार), रफिक मुर्तजा शेख (वय.32,रा.मंगळवार पेठ), अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय.27,रा. कासेवाडी), प्रशांत सॅम्युयल गायकवाड (वय.32,रा. ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय.29,रा. घोरपडी गाव), मोईब नईम खान (वय.24,रा. बोपोडी), असिफ फिरोज पठाण (वय.36,रा. लोहीयानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी मुळची बिहार येथील आहे. तिचे वडील वानवडी येथील एका व्यक्तीच्या घरी माळीकाम करतात. ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. 31 ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या बिहार येथील मित्राला भेटायला निघाली होती. घरच्यांना याची माहिती न देताच ती स्टेशन परिसरात आली होती. मात्र बिहार येथे जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.
रात्री उशीरापर्यंत ती स्टेशन परिसरात फिरत होती. आरोपींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिला येथे थांबण्याचे कारण विचारले असता, तिला बिहार येथे जायचे असून, तिकिटासाठी पैसे नसल्याचे सांगितले.
आरोपींनी पिडीत मुलीला पैसे देण्याचे आमिष दाखवून तेथून रिक्षात बसवून नेले. त्यानंतर विविध ठिकाणी तिच्यावर सामूहीक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी तिला दुसऱ्या लोकांच्या ताब्यात दिले. त्यांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी रेल्वेने मुंबई आणि तेथून चंढीगडकडे गेली होती.