पुणे – मध्यभागातील बेलबाग चौकात परिसरात पोलिसांनी सोमवारी ‘मॉकड्रील’करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
अनुचित घटना घडल्यास त्वरीत उपाययोजना कशा करायच्या, याबाबतचा सरावही केला.
गणेशोत्सवाचा प्रारंभ १० सप्टेंबर रोजी होणार आहे. मध्यभागातील बेलबाग चौक, मंडई तसेच मानाच्या मंडळाच्या मंडपात ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. बंदोबस्ताच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पोलिसांनी सराव केला.
सरावात बाँब शोधक-नाशक पथकातील कर्मचारी, श्वान पथक, शीघ्र कृती दलातील पोलीस कर्मचारी, विशेष शाखेतील पोलीस कर्मचारी तसेच विश्रामबाग-फरासखाना पोलसी ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस आधिकारी सहभागी झाले होते.
उत्सवाच्या काळात अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. करोनाच्या संसर्गात गर्दी झाल्यास त्याचेही नियोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सोमवारी मध्यभागात ‘मॉकड्रील’ करून बंदोबस्ताचा आढावा घेतला,असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.