कोल्हापूर – लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या मंडप, डेकोरेशन व्यवसायास उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात 500 लोकांच्या उपस्थितीला परवानगी द्यावी, अशी मागणी करत आज कोल्हापुरात मंडप, डेकोरेशन व्यवसायधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
याबाबतचे जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. “नको आम्हाला अनुदान, आमच्या हाताला द्या काम’ या मागणीसाठी मंडप व मंगल कार्यालयाचे हजारो व्यावसायिक रस्त्यावर उतरले. व्यावसायिकांनी मूक मोर्चा काढत सरकारी धोरणाविरुद्ध नाराजी दर्शविली. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील व्यावसायिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.
सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉलमधील एकूण क्षमतेच्या निम्म्या आसन क्षमतेच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी मिळावी, तसेच लॉकडाऊन काळातील बॅंक कर्जावरील व्याज माफ करावे, सर्व प्रकारच्या सरकारी करातून सवलत मिळावी, यासह बारा मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी व्यावसायिकांनी काळया रंगाचे शर्ट आणि टी शर्ट परिधान करत सरकारी भूमिकेचा निषेध केला. तसेच सरकारने व्यावसायिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलनाचा वणवा मुंबईसह दिल्लीपर्यंत पेटेल, असा इशाराही दिला.
दसरा चौक येथून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. दरम्यान सकाळी नऊ वाजल्यापासून व्यावसायिकांनी दसरा चौकात एकवटण्यास सुरुवात केली. टेन्ट मंडप, मंगल कार्यालय, लॉन्स, बॅक्वेट हॉल, इव्हेंट मॅनेजमेंट, लाइट-साऊंड डेकोरेटर्स, फ्लॉवर्स डेकोरेटर्स, रांगोळी कलाकार, बॅंन्डवाले, रथी, बग्गी अशा वेगवेगळया क्षेत्रातील व्यावसायिक आंदोलनात सहभागी झाले होते.