मथुरा – मंदिरामध्ये नमाज पढल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दखल केला आहे.
नमाज पढणारे चौघेही दिलीतेल खुदाई खिदमतगार या संघटनेशी संबंधित असून मथुरेतील नंद बाबा मंदिरामध्ये त्यांनी गुरुवारी नमाज पढला होता. फैजल खान, चांद मोहम्मद, आलोक हृतिक आणि निलेश गुप्ता अशी या चौघांची नावे आहेत.
यापैकी फैजल खान याने रामचरितमानसमधील काही पंक्ती म्हटल्या आणि काही नावाजलेल्या साधूंबरोबरचे आपली छायाचित्रेही दाखवली होती. त्यामुळे आपण प्रभावित झालो असल्याचे मंदिराचे पुजारी कान्हा गोस्वामी यांनी सांगितले.
आपण ब्रज चौरासी कोसच्या सायकलवरील परिक्रमेवर असल्याचेही या चौघांनी पुजाऱ्याला सांगितले होते. त्यानंतर फैजल आणि चांद मोहम्मद यांनी मंदिरातील निर्जन परिसरामध्ये परवानगी न घेता नमाज पढला.
त्यांनी मंदिरात प्रवेश करण्यास आपला काही आक्षेप नव्हता. मात्र, त्यांनी मंदिराचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला, त्याला आपला आक्षेप असल्याचे पुजाऱ्याने सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला असल्याने या चौघांनीच आपल्या कृतीचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचाही संशय आहे.
खुदाई खिदमतगार या संघटनेला विदेशी अर्थसहाय्य मिळत असल्याचा संशयही “एफआयआर’मध्ये व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर वैदिक प्रथेप्रमाणे मंदिराच्या शुद्धीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराचे पावित्र्य नष्ट करून धार्मिक सौहार्द धोक्यात आणल्याबद्दल संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी पुजाऱ्यांच्या संघटनेने केली आहे.
मथुरेमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही समाजाचे नागरिक बंधुभावाने नांदत आहेत. त्यांच्यातील सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मथुराने नेहमीच जगाला प्रेम आणि शांतीचा संदेश दिला आहे. आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात धार्मिक सौहार्द संपवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे दिसते आहे. अशी प्रतिक्रिया महेश पाठक (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभा) यांनी दिली आहे.