पुणे – करोनामुळे मागील अनेक महिन्यांपासून बाजारपेठा ओस पडल्या होत्या. मात्र, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर निस्तेज बाजारपेठांना पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे. शनिवारी दसऱ्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या होत्या.
दसऱ्याला नवीन वस्तुंची खरेदी, शस्त्रपूजन, सरस्वतीपूजन करण्यात येते. याशिवाय घराला, वाहनांना झेंडूच्या फुलांचे तोरण लावण्यात येते. या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मंडईसह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये देखील खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
झेंडूची फुले, आपट्याची पाने, आंब्याची पाने, विड्याची पाने, मिठाई, पूजा साहित्य, सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिने, कपडे आदी साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
याचबरोबर साडेतीन मुहूर्त असणाऱ्या दसऱ्याचे औचित्य साधून खरेदीला प्राधान्य देण्यात येते. याच अनुषंगाने नवीन ए.सी, फ्रीज, टी.व्ही, मोबाइल आदी इलेक्ट्रिक उपकरणे, दुचाकी, चारचाकी वाहने, सध्या ट्रेन्डमध्ये असणारी सायकल घरी नेण्यासाठी “ऍडव्हान्स बुकिंग’साठी ग्राहकांची शोरुम्स आणि दुकांनांमध्ये लगबग सुरू होती.