तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – पुस्तके वाचली पाहिजेत. यामुळे नक्की आनंद आणि ज्ञान मिळेल. वय होत आहे म्हणून दुःखी होवू नका वृध्द होण्यातही आनंद आहे. वाटा या अंधारातच शोधाव्या लागतात, असे प्रतिपादन व्याख्याते संजय कळमकर यांनी केले.
यावेळी हिंदमाता नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा विभावरी दाभाडे, सुहास धस, माजी नगराध्यक्ष रविंद्रनाथ दाभाडे, सुरेश धोत्रे, उमाकांत कुलकर्णी, अण्णा देशमुख, डॉ. शाळीग्राम भंडारी, कैलास भेगडे, महेश शाह, पंढरीनाथ दाभाडे, प्रदीप टेकवडे, सुधाकर देशमुख, महादेव वर्तले, दत्तात्रय कांदळकर आदी उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे येथे आयोजित कै. विश्वनाथराव दाभाडे स्मृती हिंदमाता व्याख्यानमालेत आनंदाच्या वाटा या विषयावर संजय कळमकर बोलत होते. अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिराचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते.
या वेळी डॉ. सुजीत कुमार यांना वैद्यकीय भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्याख्याते कळमकर यांनी सिनेमा, नाटक, रेडीओ, टी.व्ही, फेसबुक, लग्न, राजकारण, योगासने याबाबतचे मार्मिक किस्से, गमतीजमती सांगून श्रोत्यांना खळखळून हसविले.