‘आरटीई’ प्रवेश : 29 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

प्रतिक्षा यादीतील बालकांना लाभ मिळण्यासाठी निर्णय

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या 24 हजार 980 बालकांपैकी केवळ 7 हजार 944 बालकांचेच शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावेत यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे.

 

राज्यात 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी 9 हजार 331 शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 477 “आरटीई’ प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. यासाठी 2 लाख 91 हजार 368 बालकांचे ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत नियमित प्रवेश फेरीतील व प्रतिक्षा यादीतील मिळून एकूण 1 लाख 25 हजार 906 बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात एकूण 76 हजार 233 बालकांचे प्रवेश शाळांमध्ये निश्चित झालेले आहेत. अद्यापही 39 हजार 244 प्रवेशाच्या जागा रिक्तच पडलेल्या आहेत.

 

नियमित प्रवेश फेरीचे कामकाज पूर्ण झाले असून त्यानंतर प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया 30 सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागानुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जात आहे. पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहता येतो. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये तसेच प्रवेश घेण्यासाठी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

 

…केवळ 1466 प्रवेश निश्चित

पुणे जिल्ह्यातील 972 शाळांमध्ये 16 हजार 950 जागा प्रवेशाच्या दर्शविण्यात आलेल्या आहेत. यासाठी 62 हजार 919 अर्ज दाखल झाले आहेत. प्रतिक्षा यादीतील 4 हजार 765 बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आलेली आहे. यातील केवळ 1 हजार 466 प्रवेश निश्चित झालेले आहेत. प्रवेशासाठी सतत मुदतवाढ देऊन अजूनही प्रवेशाच्या खूप जागा शिल्लक राहिल्याचे उघड झालेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.