मुंबई – मुंबई पोलिसांचे आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन आता एचडीएफसी बॅंकेत जमा होणार आहे. याआधी मुंबई पोलिसांचे वेतन ऍक्सिस बॅंकेत जमा होत असे. पण आता एचडीएफसी बॅंकेतून वेतन मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऍक्सिस बॅंकेचा करार 31 जुलैला संपल्यानंतर अनेक नवीन बॅंकांचे प्रस्ताव सरकारकडे आले होते. यामध्ये एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात अधिक सुविधा मिळत असल्याने या बॅंकेची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
एचडीएफसी बॅंकेकडून मुंबई पोलिसांना उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास 10 लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास 1 कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना एचडीएफसी बॅंक देणार असल्याचे समजते.