अलीगढ – उत्तर प्रदेशच्या बहुचर्चित आणि वादग्रस्त हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दलित तरुणीच्या न्यायवैद्यक अहवालावर (फॉरेन्सिक रिपोर्ट) प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अलीगढच्या दोन डॉक्टरांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमधून डॉ. अझिम मलिक तसंच त्यांचे सहकारी डॉ. ओबेद हक यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करण्यात आलं आहे.
हाथरस घटनेच्यावेळी डॉ. मलिक याच रुग्णालयातील एमर्जन्सी ऍन्ड ट्रॉमा सेंटरमध्ये मेडिकल अधिकारी पदावर कर्तव्यावर होते. हाथरस प्रकरणातील पीडित मुलीचा एमएलसी अहवाल याच डॉक्टरांच्या टीमने तयार केला होता. तर डॉ. हक यांनी पीडितेच्या मेडिको लीगल केस अहवालावर स्वाक्षरी केली होती.
फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेवर बलात्कार झालाच नसल्याचा दावा केला होता. यावर, डॉ. मलिक यांनी फॉरेन्सिक अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. फॉरेन्सिक अहवालासाठी पिडीतेचे नमुने बलात्कारानंतर 11 दिवसांनी घेण्यात आले होते. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार असे नमुने बलात्कारानंतर 96 तासांच्या आत घेण्यात आल्यासच नमुन्यांच्या तपासणीत बलात्काराची पुष्टी होऊ शकते, असं डॉ. मलिक यांचं म्हणणं होतं.
यानंतर, त्यांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शाह झैदी यांनी एका पत्राद्वारे तत्काळ प्रभावानं डॉ. मलिक यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची सूचना दिली.