महिला, बालकल्याण विभागाची योजना : करोनापासून बचाव करण्यासाठी मोलकरणींनाही प्रशिक्षण
पिंपरी – बदलल्या कार्यशैलीनुसार पिंपरी चिंचवड महापालिकाही आपल्या विविध योजनांमध्ये बदल करीत आहेत. महिला व बालकल्याण विभागातर्फे कोविड-19 प्रशिक्षित मोलकरीण, वृद्धांसाठी कोविड-19 प्रशिक्षित स्वयंसेवक तसेच कोविड-19 संवेदनशीलता आणि जागृकता प्रशिक्षण हे तीन नवीन प्रशिक्षण पाठ्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गात आत्तापर्यंत 30 हजार महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे.
महिलांना आपल्या पायावर उभे राहता यावे, तसेच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा यासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध प्रशिक्षण योजना दरवर्षी राबविण्यात येत असतात. अशा प्रशिक्षण वर्गावर महापालिका दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करते. महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आले आहे. यापूर्वी महापालिकेने शिलाई प्रशिक्षण देऊन त्यानंतर शिलाई मशिनचे वाटपही केले होते. या प्रशिक्षण वर्गातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झालेले आहेत.
सन 2020-21 या वर्षाकरिता महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने पंडीत दीनदयाल उपाध्याय – महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात इंटेरिअर डिझाईम व डेकोरेशन प्रशिक्षण, हेअर स्पा-हेअर स्टाईल व मेकअप ब्युटीशियन प्रशिक्षण, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणेचे प्रशिक्षण, इन्स्टंट फूड प्रशिक्षण, स्पोकन इंग्लिश-संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, फॅशनेबल ड्रेस डिझायनिंग स्पेशलायजेशन प्रशिक्षण, फायबर ग्लास ऍडव्हान्स प्रशिक्षण, बाल संगोपन प्रशिक्षण, पोषक आहार व आरोग्य प्रशिक्षण, कार्यक्रम व्यवस्थापन प्रशिक्षण, मेणबत्ती बनविणे, कोविड-19 संवेदनशीलता आणि जागरुकता प्रशिक्षण, वृद्धांसाठी स्थानिक कोविड-19 स्वयंसेवक, आणि कोविड-19 प्रशिक्षित मोलकरीण असे 14 प्रकारचे प्रशिक्षण राबविण्यास सुरवात केली आहे. मोफत होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्यांनी आपली नावे, फोटो आणि आधारकार्डची झेरॉक्स संबंधितांकडे जमा करणे अनिवार्य आहे.
तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये…
शहरात मोठ्या संख्येने मोलकरीण कार्यरत आहेत, या मोलकरीण अनेक घरांमध्ये काम करतात. करोनाच्या काळात संसर्गाच्या भीतीने घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायट्यांना मज्जाव केला होता. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे जाणून पालिकेने यावेळी एक वेगळा कोर्स आपल्या प्रशिक्षण यादीत समाविष्ट केला. घरकाम करणाऱ्या महिलांना आपला व इतरांचा करोनापासून बचाव करत काम कसे करावे, याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले.
‘महापालिकेने ऑगस्ट महिन्यात प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे. कोविड-19 या संदर्भातील तीन प्रशिक्षणास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत 30 हजाराहून अधिक महिलांनी यामध्ये प्रशिक्षण दिले आहे. मागणीप्रमाणे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. या प्रशिक्षणाचा मोठा फायदा महिलांना होत आहे.’
– अजय चारठणकर, सहायक आयुक्त-महिला बालकल्याण विभाग