मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ते लवकरच राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करतील असेही बोलले जात आहे. मात्र, एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
विधानसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुडे या देखील नाराज होत्या. त्यांनी
अनेकवेळा आपली नाराजी बोलून दाखवली होती. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही एकत्रितपणे जाहीर कार्यक्रमांमधून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. मात्र, नुकतीच पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाने त्यांची नाराजी दूर केलीय असं म्हटलं जात आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही खडसे पक्ष सोडतील का ? यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहावे. राजकारण कसे आहे, त्यांना चांगले महिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा माला विश्वास आहे, असे फडणवीस म्हणाले.