मुंबई – परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदील झाला असून मदतीसाठी सरकारकडे विनंती करत आहे. सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
‘परतीच्या पावसामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाॅलीवुडची चाटूगिरी करतायत. मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर लक्ष द्या.’ असं ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
परतीच्या पावसामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॉलीवुडची चाटूगिरी करतायत. मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर लक्ष द्या.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) October 15, 2020
दरम्यान, परतीच्या पावसामुळे आणि वादळी अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला. या अतिवृष्टीमुळे सोलापूरातील 14 तर पुण्यातील 4 जणांचा बळी गेला. लोकांच्या घरात दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर, बारामती या 4 ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पीकांचे झालेले नुकसान तसेच घरांचे, मालमत्तेचे झालेले नुकसान यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.