नवी दिल्ली – राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या बिहार राज्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने येथील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. अशातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार मैदानात उतरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार गूसराय जिल्हयातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सूर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचे नामांकन भरताना उपस्थित होते.
याचदरम्यान, कन्हैया कुमार यांनी आयोजित सभेत भाजपावर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.कन्हैया कुमार यांनी म्हटलं की,’पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपाचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत.
ते पुढे म्हणाले मला सतत देशद्रोही म्हणत असाल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन. असं म्हणत त्यांनी भाजप पक्षावर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे. सध्या कन्हैया कुमार यांचा सभेतील व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
तत्पूर्वी,दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारात चार वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. त्या घोषणाबाजीला कन्हैय्याने पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. त्यावरून त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास दिल्ली पोलीस प्रयत्नशील होते. मात्र, त्यासाठीची परवानगी देण्याचा विषय आप सरकारपुढे अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता.