आर्थिक मदतीची व्यक्त केली अपेक्षा
पुणे – लॉकडाऊनमुळे खासगी कोचिंग क्लासेस व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे क्लासचालक, खासगी शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोचिंग क्लासेस असोसिएशनने राज्य शासनाकडे आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करत 1 नोव्हेंबरपूर्वी परवानगी देण्याचा आग्रह धरला आहे.
राज्यात 25 हजारांपेक्षा जास्त कोचिंग क्लासेस असून त्यात सुमारे 2 लाख 50 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. शिक्षण क्षेत्राचा दर्जा व निकाल सुधारण्यामध्ये क्लासेसचे मोठे योगदान असते. क्लासेसचे भाडे, शिक्षकांचे पगार, शैक्षणिक साहित्य, शासनाचे विविध कर यासाठी क्लासचालकांना मोठा खर्चही करावा लागतो. मात्र, सध्या उत्पन्नाचे साधन बंद आहे. त्यामुळे अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने क्लासेसचे एक वर्षाचे जी.एस.टी., आयकर, व्यवसाय कर, वीजबिल, स्थानिक कर माफ करावेत, क्लासेसचा सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात समावेश करावा, आदी मागण्या केल्या. राज्य शासनाने अटी शर्थिंवर क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात एकाच दिवशी क्लासेस सुरू करण्यात येतील.
त्यावेळी एकाही क्लासच्या संचालकांवर कारवाई केल्यास आत्मदहनाचा इशारा असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर, उपाध्यक्ष प्रा. पंढरीनाथ वाघ, कोषाध्यक्ष प्रा. आप्पासाहेब मस्के पाटील, प्रा. रामेश्वर गटकळ, प्रा. गणेश ढाकणे, प्रा.उमेश बोरसे, प्रा.रामेश्वर जंगले यांनी दिला.