दुबई – कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांच्या आक्रमक फलंदाजी नंतरही अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला सनरायझर्स हैदराबादकडून अवघ्या 7 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विजयासाठी 165 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईचा डाव 5 बाद 157 धावांवर रोखून हैदराबादने विजय मिळवला.
That was a nail-biting game here in Dubai. @SunRisers win by 7 runs.#Dream11IPL #CSKvSRH pic.twitter.com/TFKp2Uz5kP
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2020
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने प्रियम गर्गच्या अर्धशतकी खेळीने त्यांना 5 बाद 164 धावा अशी समाधानकारक मजल मारता आली. नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आला. स्पर्धेतील आजवर झालेल्या सामन्यात आक्रमक प्रारंभ केलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नर व बेअरस्टो यांनी निराशा केली.
वॉर्नर स्थिरावला असे वाटत असतानाच लेग स्पीनर पियुष चावलाने त्याला बाद करत चेन्नईच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर दूर केला. दीपक चहरनेही अचूक मारा करताना बेअरस्टोला बाद केले व हैदराबादच्या फलंदाजीवर वर्चस्व राखले. या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत. मनीष पांडे याने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तो आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याला ठाकूरने 29 धावांवर बाद केले.
या सामन्यात चेन्नई संघाने दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या अंबाती रायडूला तसेच ड्वेन ब्राव्हो यांना संघात घेतले. रायडूनेच हैदराबादच्या सर्वात अनुभवी फलंदाजाला धावबाद केले. रायडूने केलेल्या चेंडू फेकीवर अप्रतिम व वेगवान कामगिरी करत यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने केन विल्यमसनला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद केले. त्यानंतर मात्र, प्रियम गर्ग व अभिषेक शर्मा यांची जोडी चांगली जमली. त्यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 4 बाद 69 अशा दयनीय स्थितीतून संघाला बाहेर काढले. या जोडीने 15 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले.
शर्मा आक्रमक खेळण्याच्या नादात चहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने गर्गसह 5 व्या गड्यासाठी 77 धावांची बहुमोल भागीदारी केली. त्याने 24 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावताना 31 धावा केल्या. दरम्यान गर्गने आपले अर्धशतक पूर्ण केले. गर्गने 26 चेंडूत 6 चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक :-
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 5 बाद 164 धावा. (डेव्हिड वॉर्नर 28, मनीष पांडे 29, अभिषेक शर्मा 31, प्रियम गर्ग नाबाद 51, अब्दुल समद-नाबाद 8, दीपक चहर 2-31, पियुष चावला 1-20, शार्दुल ठाकूर 1-32) चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 5 बाद 157 धावा. (रवींद्र जडेजा 50, महेंद्रसिंग धोनी-नाबाद 47, सॅम कुरेन-नाबाद 15, टी. नटराजन 2 – 43).