“जर सरकारने काहीच चुकीचं केलं नाही तर…” – संजय राऊतांचा योगी सरकारला सवाल

मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह कुटुंबियांना न सोपविता येथील पोलीस प्रशासनाने परस्पर दहन केल्याचा आरोप करण्यात येतोय. उत्तर प्रदेश पोलिसांनी माध्यमे व कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या नेतेमंडळींची देखील अडवणूक केल्याने राज्यसरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

अशातच आता शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील उत्तर प्रदेश सरकारला याबाबत जाब विचारला आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत यांनी, राज्य सरकारने काही चुकी केली नाहीये तर माध्यमांना का रोखलं जातंय? असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “मला समजत नाही माध्यमांना का अडवलं जातंय? जर राज्य सरकारने काहीही चुकीचं केलेलं नाही तर माध्यमांना अडवण्याचे कारण काय? माध्यमांना घटनास्थळी जाण्याची परवानगी देऊन काय तथ्य  बाहेर येउद्यात.”


दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज जोरदार टीका करण्यात आली आहे.

आजच्या सामनाच्या “ए अबले, माफ कर! हे तुमचे हिंदुत्व!” या मथळ्याखालील अग्रलेखात “महाराष्ट्रातील पालघरात दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱया योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे?”

“मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून ‘कर्कश’ मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत. देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीची बाबरी पाडली म्हणून पेटलेला हा देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे, समाज नपुंसक बनला आहे व मतदार गुलाम झाला आहे. हाथरसच्या मातीत राख होऊन हुंदके देणाऱया ए अबले, आम्हाला माफ कर!” अशी सडकून टीका करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.