बीजिंग- संकट आले की हातपाय गाळून बसण्याचा मानवी स्वभाव असतो. लोक घाबरतात, नैराश्यात जातात. मात्र सगळेच या स्वभावाचे नसतात. काही जण वेगळेही असतात. जे वेगळे असतात ते त्या संकटाचाही फायदा करून घेतात. संकटाचे संधीत रूपांतर करतात आणि आपली ताकद वाढवतात.
हे सगळे सांगायचे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. पुढच्या महिन्यात त्या देशात अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. प्रचाराची धामधुम सुरू असताना ट्रम्प अचानक करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. आता काही दिवस दौरे नाहीत की मतदारांच्या गाठीभेटी नाहीत. क्वारंटाइन होउन गप्प बसायचे. त्यांच्या पत्नी मेलॅनिया यांनाही करोना झाला आहे. मात्र गप्प बसतील ते ट्रम्प कसले?
करोनाच्या या संधीचा ट्रम्प हमखास फायदा करून घेणार असा दावा चीनचे अमेरिकेच्या संदर्भातील तज्ञांनी केला आहे. गेल्या काही दिवसांत ट्रम्प यांनी चीनवर सगळ्यांत जास्त शाब्दिक वार केले आहेत. त्यांचे हे हल्ले आता आणखी तिव्र होत जातील असा दावा या तज्ञांनी केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प अगोदीपासूनच करोनाला चीनी व्हायरस म्हणत होते. आता त्यांना स्वत:ला त्याची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यात आणि चीनवरील टीकेत आणखी कडवटपणा येण्याची शक्यता आहे.
ते काही दिवस मतदारांच्या पूर्वीप्रमाणे गाठीभेटी घेउ शकणार नाहीत. मात्र अन्य माध्यमे त्यांच्या दिमतीला आहेत. त्याचा उपयोग करून ते आपली टीमकी वाजवू शकतील.
मतदारांचा आणि अमेरिका फर्स्टचा आपला नारा ते पुन्हा बुलंद करतील. आपण स्वत:ची काळजी न करता देशकार्यासाठी वाहुन घेतल्यामुळे करोनाच्या धोक्याकडेही आपले दुर्लक्ष झाले असा त्यांच्या प्रचाराचा रोख असू शकतो नव्हे, तर तो तसाच असेल असे या चीनी तज्ञांचे म्हणणे आहे.
ट्रम्प आणि रिपब्लिक पक्षाचे ज्यो बिडेन यांच्यात जोरदार लढत यंदा आहे. सध्या तरी बिडेन यांचे पारडे ट्रम्प यांच्या तुलनेत जड आहे. मात्र आता करोनाने चित्र पालटू शकते. ट्रम्प तसे करू शकतात असेही चीनी अभ्यासकांचे म्हणणे आहे.